Friday, December 7, 2018

"मासानां मार्गशीर्षोऽहम्।"

॥ श्री गुरुदेव दत्त ॥    
॥ श्री स्वामी समर्थ ॥
॥ येळकोट येळकोट जय मल्हार ॥

आज शनिवार, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ! मार्गशीर्ष मासारंभ !! (दि. ८ डिसेंबर २०१८ ) वैदिक काळापासून मार्गशीर्ष महिना अत्यंत पवित्र मानला जातो. अशा या पवित्र मार्गशीर्ष महिन्याचा प्रारंभ आजपासून होत आहे. आजचा दिवस हा देव दीपावली (देवदिवाळी) म्हणून देखील ओळखला जातो. मुख्यत: चित्तपावनांमध्ये कुलदैवत, ग्रामदैवत यांना भजण्याचा हा दिवस होय. 

आजच्या दिवशीच महाराष्ट्राचे आराध्य दैवत मल्हारी मार्तंड भैरवाचे म्हणजेच खंडेरायाचे षडरात्रोत्सव (मल्हारी नवरात्री) अर्थात चंपाषष्ठीच्या नवरात्रास प्रारंभ होत आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत चंपाषष्ठीचे असे सहा दिवस हे नवरात्र असते म्हणून याला षडरात्रौत्सव असे देखील अधिक संयुक्तीकपणे म्हटले जाते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. 

मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व खरोखरच अपरंपार आहे. गीतेमध्ये तर स्वत: भगवान श्रीकृष्णाने "मासानां मार्गशीर्षोऽहम्।"  असे म्हटले आहे. याचाच अर्थ असा की मार्गशीर्ष महिना माझेच (भगवान श्रीकृष्णाचे) स्वरूप आहे. स्कंद पुराणात देखील या महिन्याचा महिमा गायला आहे. भगवान विष्णुला प्रसन्न करण्यासाठी उपासना करण्यासाठी हा अत्यंत अनुकूल महिना आहे. याच महिन्यातील शुद्ध एकादशीला "मोक्षदा एकादशी" असेही म्हणतात. याचदिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली म्हणून या मोक्षदा एकादशीलाच "गीता जयंती" असेही म्हणतात. कदाचित जगाच्या पाठीवर भगवद्गीता हा एकमेव ग्रंथ असावा ज्याची जयंती साजरी केली जाते.

भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या श्रीरामाचा यांचा विवाह सीता मातेशी याच महिन्यात शुद्ध पंचमी दिवशी झाला. म्हणून हा दिवस "विवाह पंचमी" म्हणून साजरा केला जातो.

भगवान विष्णूची पत्नी अर्थात श्री महालक्ष्मी हिचे श्री महालक्ष्मी व्रत देखील याच महिन्यात मोठ्या प्रमाणात महिला घरोघरी करतात. 

याच महिन्यात मार्गशीर्ष पौर्णिमेला श्रीदत्त जयंती साजरी केली जाते. म्हणून दत्तपरंपरेत या महिन्याचे विशेष महत्त्व आहे. भारतीय भक्तीपरंपरेच्या उन्नतीमध्ये भगवान श्री दत्तात्रेय एक अनोखे अवतार आहेत. "ब्रह्मा-विष्णू-महेश" यांचा तिघांचा एकत्रित अवतार म्हणजे "भगवान दत्तात्रेय" होय. "रज-तम-सत्व" या त्रिगुणांच्या, "इच्छा-कर्म-ज्ञान" या तीन भावांच्या आणि "उत्पत्ति-स्थिति-लय" या तीन अवस्थांच्या एकत्रित रूपामध्ये ते विराजमान आहेत. 
भक्ताने स्मरण करताच भगवान दत्तात्रेय धावून येतात अशी दत्तभक्तांची अढळ श्रद्धा आहे म्हणून श्रीदत्तात्रेयांना "स्मर्तुगामी" किंवा "स्मरणगामी" असेही म्हणतात.

मार्गशीर्ष महिन्यात ही श्रीदत्तजयंती येत असल्याने सर्व दत्तभक्तांमध्ये व दत्त परंपरेमध्ये या महिन्याचे विशेष महत्व आहे. दत्तभक्तांसाठी भगवान दत्तात्रेयांची उपासना, आराधना करून त्यांना प्रसन्न करण्यासाठी हा महिना अत्यंत सुयोग्य असा महिना मानला जातो. विशेषतः "मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी से मार्गशीर्ष शु. चतुर्दशी" या सप्ताहात गुरुचरित्राचे पारायण भाविक प्रामुख्याने करतात. या सप्ताहाला "श्रीदत्त जयंती सप्ताह" किंवा "श्री गुरुचरित्र सप्ताह" असेही म्हणतात. या महिन्यामध्ये  आणि प्रामुख्याने या सप्ताहामध्ये 
 "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।" या श्रीदत्त संप्रदायाचा महामंत्राचे नामस्मरण तर केले जातेच. त्याचप्रमाणे सामुदायिक नामस्मरण तसेच अखंड नामस्मरण अशा कार्यक्रमांचे तसेच अन्य धार्मिक-अध्यात्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन मोठ्या प्रमाणावर केले जाते. या महिन्याचे अध्यात्मिक महत्त्व लक्षात घेऊन व या श्रीदत्तजयंती सप्ताहाचे औचित्य साधून श्रीस्वामीकृपेने आपल्या "श्री स्वामी समर्थ भक्त परिवार" समूहाच्या व श्री विठ्ठल सायन्ना श्रीदत्त मंदिराच्या "यादव कुटुंबीय" यांच्या संयुक्त विद्यमाने "रविवार दि. १६ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ९:३० वाजता" ठाणे शहरातील विठ्ठल सायन्ना दत्त मंदिर येथे "सामुदायिक नामस्मरण सोहळ्याचे" आयोजन केले आहे. या विशेष सोहळ्याचा देखील सर्व भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा.

या कार्यक्रमाची  माहिती पुढीलप्रमाणे :-

** जाहीर निमंत्रण : सामुदायिक नामस्मरण सोहळा **
रविवार दि. १६ डिसेंबर २०१८, 
वेळ : सकाळी ९.३० ते दु.१२:३० वा.
स्थळ : विठ्ठल सायन्ना दत्त मंदिर, 
शुभा रेस्टॉरंटच्या समोर, दमानी इस्टेट, नौपाडा, 
लाल बहादूर शास्त्री मार्ग, ठाणे (प) ४००६०२. 
संपर्क - प्रथमेश लोके : 7021942657  
(कृपया संध्या. ५ नंतरच संपर्क करावा)
प्रवेश विनामूल्य ! नाव नोंदणी आवश्यक !
 इच्छूकांनी आपले नाव या लिंकवर ऑनलाईन नोंदवावे : http://bit.ly/thane18

तरी ज्यांना शक्य आहे अशा सर्वांनी या श्रीदत्तजयंती सप्ताह विशेष नामस्मरण सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा. इच्छूकांनी वरील लिंकवर नावनोंदणी करावी. काही अडचण आल्यास मात्र तुम्ही 7021942657 या नंबरवर SMS द्वारे (WhatsApp द्वारे नाही!) नोंदणी करू शकता. 

तर अशा या मार्गशीर्ष महिन्याचे महत्व खरोखरच अपरंपार आहे. त्याचे जितके वर्णन करावे तितके कमीच. मी माझ्या अल्पकुवतीनुसार या महिन्याचा महिमा सांगण्याचा प्रयत्न केला. आपणां सर्वांनी देखील या काळात भगवान दत्तात्रेयांची, दत्तावतारी श्री स्वामी समर्थांची उपासना करून त्यांना प्रसन्न करावे हीच मनोमन इच्छा आहे. 

अशा या पावन देव दिपावलीच्या दिवशी आपले कुलदैवत,  श्री दत्तगुरु महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री मल्हार मार्तंड भैरव महाराजांच्या चरणी सादर सप्रेम दंडवत. भगवान श्री दत्तात्रेयांची, श्री स्वामी समर्थ महाराजांची, खंडेरायांची आपल्यावर व आपल्या संपूर्ण कुटुंबीयांवर सदैव कृपा राहो हीच दत्तचरणी प्रार्थना.

॥ श्री गुरुदेव दत्त ॥
॥ श्री स्वामी समर्थ ॥
॥ येळकोट येळकोट जय मल्हार ॥

आपला नम्र,
प्रथमेश लोके (7021942657)
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार, समूह

अशा अध्यात्मिक विशेषतः श्री स्वामी समर्थ व श्री दत्तात्रेय महाराजांविषयी पोस्ट्स वाचण्यासाठी खालील
फेसबुक ग्रुप (समूह) तसेच WhatsApp लिस्ट अवश्य जॉईन करा.

ग्रुप : https://www.facebook.com/groups/swamisamarthparivar
WhatsApp मार्फत अपडेट्स मिळवण्यासाठी या 7021942657 क्रमांकावर SMS करून नाव नोंदवावे.

विशेष सूचना : असे अध्यात्मिक माहितीपर संदेश पुढे पाठवणे व इतरांशी शेअर करणे ही देखील भगवंताची सेवाच आहे हे जाणून हा संपूर्ण संदेश नावासहित व कुठलीही काटछाट न करता आवर्जून फेसबुक, व्हॉटसअप ग्रुप्समध्ये अधिकाधिक  शेअर करावा ही नम्र विनंती. जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत या मार्गशीर्ष महिन्याचा महिमा पोहोचेल.)