Wednesday, March 25, 2020

** श्री स्वामी समर्थ जयंती विशेष लेख **

** स्वामी माझा अवतरला । दीन भक्तांच्या काजाला ॥ **
** श्री स्वामी समर्थ जयंती विशेष लेख **
(आवर्जून वाचा व जास्तीत जास्त शेअर करा)

आज गुरुवार, चैत्र शुद्ध द्वितीया (दि. २६ मार्च २०२०)! अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची जयंती अर्थातच श्रीस्वामी महाराज प्रगटदिन. 


या पावनदिनी श्रीस्वामी महाराजांना आमचे कोटी कोटी प्रणाम आणि आपणा सर्वांना श्रीस्वामी समर्थ जयंती उत्सवाच्या शुभेच्छा.



श्री स्वामी समर्थ हे प्रत्यक्ष परब्रह्म आहेत. त्यांनीच या विश्वाची निर्मिती केली आहे. खरोखरच अनंत कोटी ब्रह्मांडाचे ते खरेखुरे नायक आहे. त्यांच्या हाती असलेली गोटी हि ब्रह्मांडावर असलेल्या त्यांच्या निर्विवाद सत्तेचीच आठवण करून देते. आज म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीया हा स्वामींचा जयंती उत्सव अर्थातच प्रगटदिन. पण श्रीस्वामी कसे प्रगट झाले, कुठल्या वर्षी प्रगट झाले याबद्दल मात्र स्वामी चरित्रकारांमध्ये एकवाक्यता नाही परंतु हे सर्वच जण चैत्र शुद्ध द्वितीया हीच स्वामी महाराजांची जयंती आहे असे मानतात. त्यामुळे "चैत्र शुद्ध द्वितीया" या तिथीबाबत कुठलेही दुमत नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. 


प्रत्यक्ष श्रीस्वामी महाराज ज्यांना आपला पुत्र मानीत असे हरिभाऊ तावडे उर्फ श्री स्वामीसुत महाराज सांगतात की  शालिवाहन शके १०७१ चैत्र शु. द्वितीया (इ.स.११४९) या शुभ दिवशी स्वामी महाराज अष्टवर्षीय (आठ वर्षाच्या) बालक स्वरूपात उत्तर भारतात हस्तिनापूरजवळील छेले या खेडेगांवी धरणी दुभंगून प्रकट झाले. श्रीस्वामीसुतांनी रचलेल्या श्रीस्वामी अवतारकांड या पोथीत हा प्रसंग सविस्तर वर्णिलेला आहे. श्रीस्वामी समर्थ महाराजांनीच श्रीस्वामीसुत महाराजांना हा दृष्टांताने सारे स्मरण केले.  मध्यहिंदुस्थानात हस्तिनापूरनजीक छेलिखेडेग्रामी विजयसिंग नावाचा एक आठ वर्षाचा बालक राहत असे. भक्त प्रल्हादाप्रमाणे हा देखील भगवंताचा भोळा भक्तच होता असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तर या अशा या छेलिखेडेग्रामी चैत्र शुद्ध द्वितीयेला शके १०७१ ला सकाळी एका वटवृक्षाजवळ हा बालक गोटी खेळ खेळण्यासी गेला. हा प्रसंग श्रीस्वामीसुत रचित अवतारकांडात पुढीलप्रमाणे वर्णिलेला आहे.-

 ‘विजयसिंगे ही गोटी, वटवृक्षछायेस गोमटी ।
भगवंत मानोनिया जगजेठी । मांडोनिया खेळतसे ।
अर्थात विजयसिंग नावाचा तो बालक या वटवृक्षाछायेखाली भगवंत जगजेठी स्वतःच सोबत आहे असं समजून गोटी मांडून आनंदाने, कौतुकाने हा गोटी खेळ खेळत होता.  एक डाव स्वतः खेळून दुसरा डाव देवाला 'देवा बापा खेळ' असं सांगत होता आणि देवाचा डावही स्वतःच खेळत होता. असा खेळ खेळण्यात काही वेळ निघून गेला आणि त्याठिकाणी लहानमोठे लोक जमले. एकटाच खेळतो म्हणून ती लोक लांबूनच त्याला हसू लागली, बोलू लागली, चिडवू लागली. परंतु याची काहीच पर्वा न करता विजयसिंग मनात म्हणे तो भगवंतच माझ्याबरोबर खेळेल आणि या विचाराने भगवंताचे नाव घेऊन तो आनंदाने पुन्हा खेळ खेळू लागला आणि पुन्हा देवाला म्हणाला, 'देवा बापा खेळा आता!' दुसरीकडे  प्रत्यक्ष सर्वव्यापी परब्रह्म सर्वेश्वर हा कली मातल्याने अधर्माचा बिमोड करण्यासाठी, दीनभक्तांचा सांभाळ करण्यासाठी, जगदोद्धारासाठी आणि धर्मसंस्थापनार्थ अवतार घेणार असताना विजयसिंगाचा हा भोळाभाबडा भक्तीभाव पाहून अवतार घेण्याची वेळ आली आहे असे मनोमन म्हणाला.
पुढील हकीकत अशी की विजयसिंग भगवंताच्या नावाने एक गोटी त्या वटवृक्षस्थळी मांडून ठेवली आणि दुसरी गोटी हाती घेऊन पुन्हा खेळू लागला. अशावेळी अचानक मोठ्याने कडकड  असा भयावह आवाज होऊन कडकडाट झाला. ते ऐकून विजयसिंग आणि तेथील लोक भयभीत झाले. भीतीने सगळे आपापल्या घरी गेले. विजयसिंग मात्र एकटाच तिथे भयभीत आणि दिनमुखाने त्या भगवंताच्या नावाने मांडलेल्या गोटीकडे पाहत बसला. तितक्यात गोटीखालील धरणीतून ॐ ॐ शब्द येऊ लागला. सारखा सारखा ॐ ॐ हा मंजुळ ध्वनी कानी पडू लागल्याने आधी भयभीत झालेला विजयसिंग तो मंजुळ ॐ कार ऐकून शांत झाला. साक्षात जगाचा स्वामी मायबाप सर्वेश्वर धरणीमधून  मंजुळ असा ॐ कार देत होता. असा ॐ ॐ' ध्वनी येत नभी स्थळी सर्वत्र ॐ कार भरला आणि...आणि दुसऱ्या प्रहरी धरणी दुभंगून जगाचे स्वामी प्रत्यक्ष परब्रह्म ब्रह्मांडनायक राजाधिराज भगवंत आठ वर्षाच्या रुपात **ॐ ॐ' असा गजर करत एक हात कमरेवर आणि एका हातात गोटी घेऊन अष्टवर्षीय सुकुमार मनोहर रुपात वटवृक्षातळी प्रकट झाले. बोला 
'ॐ अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय!'
तो दिवस होता गुरुवार, चैत्र शुद्ध द्वितीया शके १०७१!
अशारितीने श्रीस्वामी महाराज प्रगट झाले. ही घटना श्रीस्वामी महाराजांनी श्रीस्वामीसुतांना दृष्टांतरुपाने दर्शवली. तो सविस्तरपणे अवतारकांडात वाचता येईल.
किंबहुना श्री स्वामीसुत महाराजांनीच "श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव" सोहळा सर्वप्रथम म्हणजे इ.स. १८७० साली मुंबई अर्थातच मुंबापुरी मध्ये साजरा केला. त्याच्या पुढल्या वर्षी (इ.स. १८७१) हा उत्सव श्रीस्वामीसुत महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रत्यक्ष श्रीस्वामींसमक्षच साजरा केला होता. अहमदनगरचे स्वामी भक्त नाना रेखी जे स्वतः पिंगला जोतिष्य विद्येत पारंगत होते त्यांनी चैत्र शु. द्वितीया शालिवाहन शके १०७१ याच तिथी व सालानुसार श्रीस्वामींसमोरच प्रत्यक्ष ब्रह्मांडनायक श्रीस्वामी महाराजांची पत्रिका बनवली व स्वामींनीही त्या पत्रिकेस दुजोरा दिला असल्याचे स्वामी चरित्रातून उमगते. यावरून स्वामीसूतांनी सांगितलेल्या स्वामींच्या या प्रगटकथेला व वर्षाला (शके १०७१) श्री स्वामींनीच एकाअर्थी पुष्टी दिल्याचे स्पष्टपणे जाणवते. 

श्री आनंदनाथ महाराज हे असेच स्वामींचे अत्यंत जवळचे स्वामी कृपांकीत शिष्य होते. प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा त्यांचा स्वभाव असल्याने फारशा स्वामीभक्तांना त्यांचे चरित्र ज्ञात आहे. म्हणून सर्वांना इथे मुद्दाम सांगू इच्छितो श्री आनंदनाथ महाराज स्वामींच्या सहवासात तब्बल ६ वर्षे होते व स्वामींवर त्यांनी अनेक अभंग, काव्ये, कवने, स्तोत्रे, आरत्या इ. लिहिले. श्री स्वामींची संपूर्ण कृपा त्यांच्यावर होती. श्री स्वामीकृपेने श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना स्वमुखातून आत्मलिंग पादुका काढून दिल्या. या पादुका वेंगुर्ला येथील स्वामी मठात असतात. स्वामी संप्रदायात श्री आनंदनाथ महाराजांचा अधिकार फार मोठा आहे. त्यांना श्री स्वामीकृपेने

झालेल्या श्री स्वामी महाराजांच्या प्रगटीकरणासंबंधीच्या दृष्टांतानुसार ते म्हणतात - 
शालिवाहन शके तीनशे चाळीस ।
शुद्ध पक्ष पूर्ण चैत्र मास ।
अवतार घेतला द्वितीयेस ।
वटछायेसी दिंगबरु ॥
श्री आनंदनाथ महाराज यांच्या दृष्टांतानुसार शालिवाहन शके ३४० चैत्र शु. द्वितीया या दिनी उत्तरेत हिमालयाच्या आसपास वटवृक्षाच्या छायेखाली "अष्टवर्षीय सुकुमार" रुपात श्रीस्वामी प्रगट झाले. श्री आनंदनाथ महाराजांनी सुचवलेले शके (वर्ष) आणि कथा थोडी वेगळी जरी असली तरी श्री स्वामीसुत महाराजांप्रमाणेच धरणीचा भार हरण्यासाठी वटवृक्षाछायेत अष्टवर्षीय बालकाच्या सुकुमार रुपात श्री स्वामी महाराज प्रगट झाले असेच श्री आनंदनाथ महाराज म्हणतात. 
पुढील अभंगांमध्ये त्यांनी श्री स्वामी प्रगटदिनाचा प्रसंग आणि त्याचे महत्व विशद केले आहे.

** श्री आनंदनाथ विरचित अभंग **

अष्टवर्षे सुकुमार ॥ रूप धरीले सुंदर ॥ १ ॥ 
धराभार हरावया ॥ बळे लावितसे पाया ॥ २ ॥ 
कोटी मदनाची प्रभा ॥ दिव्य मूर्तीचा हा गाभा ॥ ३ ॥ 
तेज प्रकटले फार ॥ देव पायींचे किंकर ॥ ४ ॥ 
मुनी करीती स्तवना ॥ शांत होई करुणाघना ॥ ५ ॥ 
जाणूनी देवाचा आकार ॥ स्थित झाले निराकार ॥ ६ ॥ 
गुप्त राहुनी अंतरी ॥ वटामाजी निर्धारी ॥ ७ ॥
आनंद म्हणे ऐसे सार ॥ मूळ ब्रह्मीचा अवतार ॥ ८ ॥ 
            - श्री आनंदनाथ महाराज   
 (हे संदर्भ फारच कमीस्वामीभक्तांना माहिती आहे, तरी जास्तीत जास्त शेअर करावे !) त्यादृष्टीने यावर्षीचा श्री स्वामी प्रगटदिन विशेष महत्त्वाचा आहे. 

श्री स्वामींच्या दृष्टांतानुसार श्री स्वामीसुत महाराजांनी तसेच श्री आनंदनाथ महाराज यांनी वर नमूद केलेले दोन्ही श्रीगुरू स्वामी जयंतीची प्रसंग वर्णिले आहे हे आपण या इथे मुद्दाम लक्षात घेतले पाहिजे. 


श्रीस्वामीसुत महाराज व श्रीआनंदनाथ महाराजा दोघांनीही श्रीस्वामी जयंतीला गुरुवार होता असं नमूद केलं आहे. आज योगायोगाने श्रीस्वामीजयंती व गुरुवार असे दोन्ही योग यावर्षीच्या श्रीस्वामी जयंती दिनी येत आहे. तसेच यंदा उत्सवाचे १५० वर्ष आहे. त्यामुळे या तिहेरी संबंधामुळे आजच्या या श्रीस्वामीजयंतीचे आणखीनच  विशेष महत्त्व आहे. 


त्याव्यतिरिक्त स्वामी कर्दळीवनात वारुळातून प्रगट झाले हि कथा सुद्धा खूप प्रचलित आहेच (आणि हल्ली वेगवेगळ्या कारणांनी याच कथेचा पर्यायाने कर्दळीवनाचा खूपच जोरदार प्रचार केला जाताना दिसतो) पण या कथेला सांप्रदायिक आधार नसून अनेक अधिकारी स्वामीभक्त व तसेच चरित्रकार  या कथेला कपोलकल्पितच मानतात. (त्याबद्दल पुन्हा कधीतरी नक्कीच सविस्तर लिहूच ) पण सध्यातरी ही कथादेखील स्वामीभक्तांमध्ये प्रचलित आहे हि गोष्ट नाकारता येत नाही. 


असे जरी असले तरी स्वामींबद्दल आपण प्रेमाने म्हणतो, "नाही जन्म, नाही नाम, नाही कुणी माता पिता, प्रगटला अद्भूतसा, ब्रह्मांडाचा हाच पिता" ! अगदी खरंच आहे ते. स्वामींना तशा अर्थाने जन्म नाही. ते तर प्रगट झाले. अशा कित्येकवेळा ते प्रगट झाले असतील. स्वामींनी समाधी घेतल्यानंतर निलेगांव नावाच्या एका गावात स्वामी प्रगट झाले होते हे स्वामीभक्तांना ठाऊक असेलच. त्यामुळे आजच्या दिवशी ते कसे प्रगट झाले आणि नेमके कधी प्रगट झाले याच्या फार खोलात आपण न शिरता स्वामीभक्तांमध्ये सर्वमान्य असलेल्या "चैत्र शुद्ध द्वितीया" या तिथीलाच आणि गुरुवारी श्रीस्वामीच्या जन्मवारी आलेल्या यंदाच्या श्री स्वामी जयंती उत्सवाला आपापल्या घरीच संपूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने, मोठ्या उत्साहाने साजरा करूया. स्वामींना शरण जाऊया आणि भारतावरच नव्हे तर अवघ्या जगावर आलेल्या कोरोनावायरसरुपी आलेले भीषण संकट दूर होऊन सर्वांना निरोगी निरायम दीर्घायुष्य लाभो आणि त्यांची सुकोमल चरणी ठाव द्यावा हेच साकडे आपण त्यांना घालूया.


स्वामी समर्था माझे आई ।

मजला ठाव द्यावा पायी ॥

ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ यांना पुन्हा एकदा त्रिवार वंदन आणि श्री स्वामी समर्थांची अखंड कृपा आपल्या सर्वांवर राहो हीच श्रीस्वामीचरणी प्रार्थना.


( कृपया हा लेख नावासहित, श्री स्वामी समर्थ भक्त परिवाराच्या लिंकसहित शेअर करावा म्हणजे लोकांना अशा आणखीन लेखांची देखील माहिती मिळेल.)


विशेष सूचना : श्रीस्वामी समर्थ महाराज तसेच श्री शंकर महाराज यांच्याशी संबंधित आणखीन दुर्मिळ व अस्सल (Exclusive & Authentic) माहितीसाठी व इतर अध्यात्मिक माहितीपर मेसेजेस वाचण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराज परिवाराचे खालील फेसबुक पेजेस अवश्य लाईक करा अथवा व्हॉटसअप लिस्टला जॉईन व्हा. त्याकरिता खालील नंबरवर SMS करावा. तसेच आमचे टेलिग्राम चॅनेल आवर्जून जॉईन करावे.

🔸 WhatsApp : 9821941819
🔹 श्री स्वामी समर्थ परिवार फेसबुक पेज
https://fb.me/swamimajha 
🔸 Blog : http://swamisamarthparivar.blogspot.in
🔹 Telegram Channel Shree Swami Samarth Parivar 
https://t.me/swamisamarthparivar 

तसंच अधिकाधिक लोकांना व ग्रुपमध्ये हा मेसेज फेसबुक, व्हॉटसऍप इ. माध्यमाद्वारे या दोन्ही लिंकसकट व संपूर्ण आवाहनासहित शेअर करावी ही नम्र विनंती.


॥ राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय ॥ 


आपले नम्र

श्री स्वामी समर्थ भक्त परिवार, फेसबुक समूह https://www.facebook.com/swamimajha

No comments:

Post a Comment